वैरागला आदर्श महिला पुरस्कार वितरण आर्थिक दृष्ट्या महिलांनी सक्षम व्हावे - शास्त्रज्ञ शेळके

वैराग, दि. ९ शरीर ही मौल्यवान संपत्ती असून ती सांभाळण्यासाठी सकस आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. अलिकडे मोबाईलमुळे आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुलींनी व महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे कोणत्याही क्षेत्रात नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा. महिलांनी भारतीय संस्कार जपत पुढील पिढी घडविली पाहिजे. आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम राहिल्यास कुटुंब व राष्ट्र सक्षम होऊन मान सन्मान आपोआपच मिळतील असे गृह विज्ञान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या प्रा. अनिता शेळके- सराटे यांनी वैराग येथे बोलताना व्यक्त केले.

 येथे वैराग पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन निमित्त रविवारी आदर्श महिला पुरस्कार वितरण प्रसंगी श्री साई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. अनिता शेळके - सराटे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. मिरा सूर्यवंशी या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकारी ज्योती तीर्थ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे ,डॉ. अमिता कोरके ,प्रा.अनिता मोहिते - साळुंके, सरपंच अमर लोखंडे , उपसरपंच पंकज सरकाळे , प्राचार्य खंडेराया घोडके , मुख्याध्यापक विकास पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वीर माता ,वीर पत्नी, आदर्श महिला म्हणुन महिलांनी एकट राहणं खूप कठीण आहे. सगळ्यांनाच संधी मिळतील असे नाही परंतु काही संधी स्वतः देखील निर्माण केल्या पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रात पर्दापण केल्यास महिलांना देखील त्यांची बाजू स्वतःच मांडता येईल. वैराग पत्रकार संघाने सर्व क्षेत्रातील महिलांची योग्य निवड करून त्यांचा सन्मान केला असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मीरा सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी विरपत्नी रोहिणी रामेश्वर काकडे ( गौडगाव ) व हर्षदा गोरख चव्हाण ( रातंजन ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर राणी आदमाने (सामाजिक ) ,अर्चना डिसले , (शैक्षणिक ) , अर्चना राऊत ( कृषी ), सारीका करंडे (उद्योग ) , सुवर्णा वैद्य (मुख्याध्यापिका ), स्वाती कांबळे ( महिला बचत गट ), उत्कर्षा एखंडे ( नुतन प्रशासकीय अधिकारी ) अन्न व सुरक्षा, करिष्मा गायकवाड - ( नुतन अधिकारी महसुल सहाय्यक ), निर्मला नवले (आदर्श माता ) यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र देऊन आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वैराग पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बलभीम लोखंडे , उपाध्यक्ष रामदास पवार ,सचिव भागवत वाघ ,संघटक कालिदास देवकते ,खजिनदार राहुल दळवी ,प्रसिद्धी प्रमुख आण्णासाहेब कुरुलकर ,सहसचिव काशिनाथ क्षिरसागर ,सुजित काकडे यांच्यासह इतर पत्रकार बांधवांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आण्णासाहेब कुरुलकर व कालिदास देवकते यांनी केले. कार्यक्रमास महिला ,प्रतिष्ठित नागरिक ,वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आण्णासाहेब कुरुलकर, वैराग - प्रतिनिधी