‘सैराट’नंतर काय झालं लंगड्याचं? ऐका तानाजीची कहाणी त्याच्या तोंडून!

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 2016 मध्ये आलेला 'सैराट' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. आर्ची आणि परशा या पात्रांसोबतच या चित्रपटातील 'लंगड्या' पात्राचीही विशेष चर्चा झाली. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतीच एक मुलाखत देत स्वतःच्या आरोग्यप्रश्नांबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तानाजी गळगुंडे म्हणतो, “माझं कॉलेजचं आयुष्य पूर्ण सायकलवर गेलं. माझं गाव बेंबळे पासून टेंभुर्णीमधील कॉलेज १५ किमी दूर होतं, आणि तो सगळा प्रवास मी सायकलवर करायचो. सैराटनंतर पुण्यात आलो आणि तिथून माझ्या पायाच्या समस्या सुरु झाल्या. सध्या मी सायकलवरूनच पुण्यातील सर्व कामं करतो – अगदी उपचारासाठी देखील.” यानंतर तानाजीने आपल्या वैद्यकीय प्रवासाविषयी सांगितले, “आत्तापर्यंत माझ्या पायावर ७ सर्जरी झाल्या आहेत. माझे मांडी आणि नगडी हाडं बेंड होती. सुरुवातीला त्रास नव्हता पण २२-२३ वर्षांनंतर गुढगे सुजायला लागले, चालताना त्रास व्हायला लागला. एक्स-रे काढल्यावर लक्षात आलं की माझं संपूर्ण वजन पंजावर जात होतं. हाडं सरळ करण्यासाठी डॉक्टरांनी एकूण सात शस्त्रक्रिया केल्या.” या सर्व आव्हानांचा सामना करत तानाजीने पुन्हा स्वतःला उभं केलं आहे. आज मी सायकलवरूनच माझ्या सगळ्या गोष्टी करतो,” असं तो अभिमानाने सांगतो. तानाजीचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे – एक छोट्या गावातून आलेला अभिनेता, ज्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला, त्याच काळात सुरू झालेला आरोग्याचा संघर्ष आणि त्यातूनही न डगमगता पुढे जाण्याची जिद्द – हा त्याचा खरा 'सैराट' प्रवास ठरतो.