बोलावलं अन् संसारच उद्ध्वस्त केला; मेव्हण्याकडून भाऊजीचा निर्घृण हत्या .
सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक
घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून विवाह केल्याचा राग
धरून मेव्हण्याने आपल्या भावोजीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस
आला आहे. दारूच्या नशेत हॉटेलमध्येच वाद विकोपाला जाऊन आरोपीने बाटली फोडून
भावोजीचा गळा चिरल्याने अवघ्या काही क्षणांत सुखी संसार उद्ध्वस्त झाला. याप्रकरणी
वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मयत सुशील क्षीरसागर आणि पत्नी रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता.
मात्र या विवाहाला रेश्माच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. विवाहानंतर हे
दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. सुशीलच्या मावशीच्या
कार्यक्रमानिमित्त दोघे येडेश्वरी येथे आले होते. त्यानंतर ते उक्कडगाव येथे
सासू-सासऱ्यांकडे गेले होते. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. बुधवारी रात्री
सुमारे सातच्या सुमारास आरोपी ऋषिकेश याने “हॉटेलवर जेवायला जाऊ” असे
सांगून भावोजी सुशील, बहीण रेश्मा, स्वतः
ऋषिकेश, त्याची मैत्रीण काजल सुरज मिसाळ आणि मामा मच्छिंद्र
भीमा चव्हाण यांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे नेले. जेवणादरम्यान
रेश्माच्या विवाहावरून वादाला सुरुवात झाली. “आडनाव एकच असून हे लग्न कसे केले?”
असा सवाल आरोपीने केला. त्यावर रेश्माने “आमचे प्रेमातून लग्न झाले
आहे, तुम्ही त्यात पडू नका,” असे
सांगितले. याच कारणावरून सुशील आणि ऋषिकेश यांच्यात जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने हातातील दारूची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. हॉटेल मालक अण्णा घावटे यांनी तातडीने सुशीलला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला जगदाळेमामा हॉस्पिटल, बार्शी येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर हॉटेलमधील जेवणाच्या टेबलासह संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य दिसून आले. या भीषण प्रकारामुळे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत सुशील क्षीरसागर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बार्शी येथे झाले होते. तो पुण्यात ड्रायव्हिंगचे काम करत होता, तर पत्नी रेश्मा खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. मात्र एका क्षणाच्या रागाने सख्ख्या बहिणीचे कुंकू पुसले गेले आणि एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं.