डीजीपी रामचंद्र राव निलंबित: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; कर्नाटकात मोठी खळबळ
कर्नाटकात मोठी प्रशासकीय खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात डीजीपी
रामचंद्र राव (DGP R. Rao) यांना अखेर निलंबित करण्यात
आले आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री राण्या रावचे वडील असलेल्या
रामचंद्र राव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या
कार्यालयातील कथित आक्षेपार्ह वर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर
राज्य सरकारने तातडीचा निर्णय घेतला आहे. व्हायरल व्हिडिओंमुळे प्रशासन हादरले सोमवारी
सोशल मीडियावर काही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. या
व्हिडिओंमध्ये रामचंद्र राव विविध महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा
दावा करण्यात आला. या क्लिप्समुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात तीव्र
प्रतिक्रिया उमटल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राज्य सरकारने राव यांना
तात्काळ निलंबित केले. आरोप फेटाळत राव यांचे स्पष्टीकरण निलंबनानंतर कर्नाटकचे
गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना रामचंद्र राव
यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. “मला याचा प्रचंड धक्का बसला
आहे. हे सर्व व्हिडिओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “आजकाल कोणालाही
बनावट व्हिडिओ तयार करून एखाद्याची प्रतिमा खराब करता येते. हा माझ्याविरोधात
रचलेला कट असू शकतो,” असा आरोपही त्यांनी केला. आठ वर्षे
जुना व्हिडिओ असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओ जुने असण्याबाबत विचारले असता राव
म्हणाले, “जर जुने व्हिडिओ असतील, तर
ते सुमारे आठ वर्षांपूर्वीचे असू शकतात, जेव्हा मी
बेळगावमध्ये तैनात होतो.” मात्र, त्यांनी पुन्हा एकदा या
व्हिडिओंशी कोणताही संबंध नसल्याचा ठाम दावा केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
त्यांनी गृहमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र ती
भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश या संपूर्ण प्रकरणावर
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही,
मग तो कोणत्याही पदावर असो,” असे स्पष्ट करत
त्यांनी तपास अहवालानंतर पुढील कारवाई होईल, असे सांगितले.
अभिनेत्री राण्या रावशी संबंध
आयपीएस अधिकारी रामचंद्र राव हे अभिनेत्री राण्या रावचे
वडील आहेत. राण्या रावला कर्नाटकातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सोन्याच्या
तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मार्च 2025 मध्ये दुबईहून परतताना तिच्याकडून
सुमारे 14.8 किलो सोन्याचे बार (किंमत अंदाजे 12.56 कोटी रुपये) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर बेंगळुरूतील तिच्या
निवासस्थानी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आली होती. या
पार्श्वभूमीवर डीजीपी रामचंद्र राव यांच्यावरील कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त
झाले असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता या चौकशीकडे लागले आहे.