शरद पवार, सुप्रिया सुळे यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ; सुनेत्रा पवार झाल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार
यांनी आज शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य
देवव्रत यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद
पवार खासदार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांची गैरहजेरी चर्चेचा
विषय ठरला आहे. महाराष्ट्रात प्रथमच पवार कुटुंबातील सदस्य उपमुख्यमंत्री होत
असताना पवार परिवारच या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार
यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
घेणार आहेत याबाबत कोणतीही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. या शपथविधीला
शरद पवार अनुपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी दुपारी काटेवाडीत आशाताई पवार
(अजितदादांच्या मातोश्री) यांची भेट घेतली. 'मी काकूंना भेटायला आले होते. उद्या
(रविवारी) केंद्रीय अर्थसंकल्प असल्याने मी इथून दिल्लीला रवाना होणार आहे',
अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. शपथविधीबाबत मला कल्पना
नाही, असं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित
राहण्याची विनंती पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केल्याचे
सांगण्यात येत आहे. बारामती येथे गोविंद बागेतील निवासस्थानी पार्थ यांनी शरद पवार
यांची भेट घेतली आणि शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र शरद
पवार यांनी या शासकीय सोहळ्यास सहभागी होण्यास असमर्थता दर्शवल्याचे सांगण्यात येत
आहे दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प ही
अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपण दिल्लीला जात आहोत, असे सांगत शपथविधी सोहळ्याकडे पाठ
फिरवल्याचे मानले जात आहे.