सोलापूर महापौर-उपमहापौर निवड: विनायक कोंड्याल महापौर, ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भारतीय
जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली असून, महापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक
कोंड्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी
देवकर यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात
पुन्हा एकदा ‘कोठे’ कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी
आहेत. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात देवेंद्र कोठे यांच्या
सासू श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूर महापौरपद भूषवले होते. आता त्याच
कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला महापौरपदाची संधी मिळत असल्याने राजकीय वर्तुळात याची
जोरदार चर्चा रंगली आहे.
अंतर्गत विरोधानंतरही कोंड्याल यांच्या नावावर
शिक्कामोर्तब
विनायक कोंड्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे ‘बाहेरून’ आलेल्या नेत्याला थेट महापौरपदाची उमेदवारी दिल्याने पक्षातील
काही स्थानिक पदाधिकारी व जुन्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली
होती. मात्र, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंड्याल यांच्या नावाचा ठाम आग्रह धरल्याने अखेर त्यांच्या
उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर अंतर्गत विरोध
मावळल्याचे चित्र असून भाजप एकदिलाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दिसत आहे.
उपमहापौरपदी महिलेला संधी
उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे नाव
निश्चित करण्यात आले असून, त्यामुळे महिलांच्या प्रतिनिधीत्वाला
संधी मिळणार आहे. त्या आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक व भाजपचे
कार्यकर्ते महेश देवकर यांच्या पत्नी आहेत. भाजपकडून महिलांना नेतृत्वाच्या
भूमिकेत पुढे आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.