शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून काका-पुतण्या आमनेसामने; काठीहल्ल्यात काका जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात जमिनीच्या वादातून नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सामायिक शेतजमिनीच्या खासगी मोजणीवरून झालेल्या वादात पुतण्याने काकावर काठीने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्ञानेश्वर जालिंदर इचके (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गट क्रमांक ९९९ या शेतजमिनीची मोजणी सुरू असताना पुतण्या वसंत कारभारी इचके याने मोजणीला विरोध करत शिवीगाळ सुरू केली. “मोजणी मान्य नसेल तर सरकारी मोजणी करा,” असे काकांनी सांगताच संतापलेल्या वसंतने काठीने हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपीची मुले अमोल इचके आणि समीर इचके यांनीही हातात काठ्या घेऊन ‘रानातून बाहेर निघा’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध मारहाण व दमदाटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस हवालदार अरुण उबाळे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात जमिनीच्या वादातून होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.