सोलापूर शिवसेनेत मोठा बदल: सुषमा अंधारे यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या आक्रमक आणि स्पष्टवक्त्या नेत्या सुषमा अंधारे यांची सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. तत्कालीन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षातील गळती वाढली होती. त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याने संघटना कमकुवत झाली होती.

संघटन बांधणीची मोठी जबाबदारी

या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आक्रमक भूमिका, धारदार वक्तव्ये आणि संघटन कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अंधारे यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. पक्षातील गळती थांबवणे, नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटन उभारणे, ही प्रमुख उद्दिष्टे असतील.

अंधारे विरुद्ध वाघमारे?

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या असल्यामुळे येत्या काळात सोलापूरच्या राजकारणात सुषमा अंधारे विरुद्ध ज्योती वाघमारे असा थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरचे राजकारण अधिक तापणार, हे निश्चित मानले जात आहे.

सुषमा अंधारे यांची नियुक्ती सोलापूरमध्ये ठाकरे गटासाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरेल का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.