श्रीशैल अवतरले सोलापुरात

शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या 'अभिनव श्रीशैल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्नलगीत बुधवारी रात्री साक्षात श्रीशैलच अवतरले. सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील चौथ्या दिवशी होम मैदानावर झालेल्या 'सोहळा गुरुभेटीचा' या रडी शोच्या माध्यमातून शिवयोगी सिध्दरामेश्वर आणि श्रीशैल मल्लिकार्जुन यांच्या भेटीचा प्रसंग पाहताना प्रत्येक भक्ताच्या मनात श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या दर्शनाचा लाभ झाल्याची भावना होती. बाल सिध्दरामेश्वर मानव रुपातील मल्लय्यांच्या शोधत श्रीशैल डोंगरावरून कमरीकोळ्ळा या दरीत उडी मारताना मल्लिकार्जुन अलगदपणे त्यांना उचलून घेतात. हा प्रसंग हजारो भाविकांनी आणि लाईव्ह पाहणाऱ्या असंख्य भक्तांनी याची डोळा अनुभवला. या शोनंतर झालेल्या शोभेच्या दारूकामामुळे आसमंत उजळून निघाला. होम मैदानावर परंपरेनुसार चालू असलेल्या शोभेच्या दारूकामाची आतषबाजी व प्रोजेक्टरद्वारे रडी शोचे श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. मागील तीन वर्षांपासून यात्रेनिमित्त सुरू करण्यात आलेल्या लेझर शोला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रारंभी श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि लेजर शो व शोभेच्या दारूकाम समितीचे अध्यक्ष अॅड. विश्वनाथ आळंगे यांच्या हस्ते श्रीशैल मल्लिकार्जुन आणि सिध्दरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यासाठी श्रीशैल येथील कमरीकोळ्ळ या दरीचे दृश्य दाखविण्यासाठी सुमारे २२ फूट उंचीची श्री मल्लिकार्जुन व श्री सिध्दरामेश्वरांची मूर्ती तयार करण्यात आली आहे व ही मूर्ती क्रिएटिव्ह आर्ट स्टुडिओचे उमेश व्हरकट यांनी तयार केली आहे. व्हरकट हे मूळचे सोलापूरचे आहेत. या शोमध्ये श्री सिध्दरामेश्वरांचा जन्म, श्री मल्लिकार्जुन यांच्या सगुण रूपाचे दर्शन घेण्यासाठी श्री सिध्दरामेश्वरांची श्रीशैल पदयात्रा, कमरीकोळ्ळ येथून उडी टाकताना श्री सिध्दरामेश्वर व श्री मल्लिकार्जुन या गुरु-शिष्य भेटीचे दृश्य, श्री मल्लिकार्जुन व श्री सिध्दरामेश्वर यांची षोडशोपचार पूजा, यानंतर श्री सिध्दरामेश्वर वचन गायन, श्री सिध्दरामेश्वर आधारित भक्तिगीते तद्नंतर श्री सिध्दरामेश्वरांनी सोन्नलगीला परतल्यानंतर केलेले धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्य यामुळे सोन्नलगीचे अभिनव श्रीशैलमध्ये झालेले रुपांतर, श्री सिध्दरामेश्वरांची शिवयोग समाधी व शेवटी श्री सिध्दामेश्वरांची आरती या क्रमाने कार्यक्रमाचे स्वरूप होते. बंगळुरू येथील नामांकित कंपनीस रडी शो करण्यासाठी देवस्थान समितीने निमंत्रित केले होते. या पथकात चेतन गौडा, अभिषेक, योगेश आणि सहकारी यांचा समावेश होते. या रडी लेजर शोच्या संहितेचे लेखन मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. तर अनिरुध्द जोशी, प्रा. संतोष पवार, रसिका तुळजापूरकर, जयपाल खेडकर यांचा सहभाग होता. त्यानंतर दारूकामाच्या आतषबाजीला सुरुवात झाली. पटेल यांनी स्काय शॉट, माईन्स शो, लाईनिंग शो, भारताचा नकाशा, सनफ्लॉवर, सोनेरी झाड, फॅन शॉट, डिस्को चक्र आदी प्रकार सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथील सिध्देश्वर फायर वर्क्सने तारामंडळ, इलेक्ट्रिक धबधबा, सूर्य डिझाइन, कलर चक्र, अशोक चक्र, डिस्को चक्र, ट्युबकांडी आदी सादर करून भाविकांची मने जिंकली. दरम्यान, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून मानाचे नंदीध्वज शोभेच्या दारूकामासाठी सवाद्य मिरवणुकीने होम मैदानाकडे मार्गस्थ झाले. रात्री साडेआठच्या सुमारास सातही नंदीध्वज होम मैदानात पोहोचले. याप्रसंगी पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त नीलकंठप्पा कोनापुरे, गुरुराज माळगे, मल्लिकार्जुन कळके, अॅड. आर. एस. पाटील, बाळासाहेब भोगडे, विलास कारभारी, विश्वनाथ लब्बा, प्रकाश बिराजदार, रतन रिक्के, प्रभुराज मैंदर्गीकर तसेच राजशेखर पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.