पुण्यात मातेची ममता रक्तरंजित: वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; मुलगी गंभीर जखमी
आईचे प्रेम हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं.
मात्र, या नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्याच्या वाघोली
परिसरात उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा
चिरून निर्घृण खून केला, तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे
मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असली तरी तिची
प्रकृती चिंताजनक आहे. वाघोलीत गेल्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी मोठी धक्कादायक
घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात ही थरारक घटना
घडली. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. रागाच्या भरात किंवा मानसिक
तणावातून सोनी हिने आपल्या ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर
धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. यानंतर तिने आपल्या १३ वर्षीय मुलगी
धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. लेक मृत्यूशी झुंज देतेय या अमानुष
हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी
झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल
करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब
मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून रोजगारासाठी काही वर्षांपूर्वी
वाघोली येथे स्थायिक झाले होते. आरोपी महिलेला अटक, कारण
अद्याप अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी
सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्या
पोटच्या मुलांवर इतका क्रूर हल्ला का केला, याचे गूढ अद्याप
उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी की मानसिक आजार,
या सर्व शक्यतांचा विचार करत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आरोपी
महिलेची वैद्यकीय आणि मानसिक तपासणीही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली
आहे.