बिटकॉइन 75,000 डॉलर्सखाली, चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण
आज २ फेब्रुवारी रोजी क्रिप्टो बाजारात मोठी घसरण
नोंदवली गेली. बिटकॉइनची किंमत घसरून ७४,६८३.६३ डॉलर्सपर्यंत
आली असून एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेने सुरू केलेल्या ट्रेड वॉरनंतरची ही सर्वात
नीचांकी पातळी मानली जात आहे, अशी माहिती कॉइनमार्केट कॅपच्या
आकडेवारीतून समोर आली आहे.
सलग चार महिने घसरण
२०२५ मधील उच्चांकापासून बिटकॉइनमध्ये सुमारे ४० टक्के
घट झाली आहे. जानेवारी महिन्यातच बिटकॉइन ११ टक्क्यांनी घसरला. ऑक्टोबर २०२५
पासून सुरू झालेली ही घसरण सलग चौथ्या महिन्यातही कायम असून २०१८ नंतरची ही सर्वात
दीर्घकालीन आणि तीव्र घसरण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
बिटकॉइनसोबतच दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी एथेरियम देखील २,२०० डॉलर्सच्या खाली घसरली आहे.
घसरणीची प्रमुख कारणे
‘डेल्टा एक्सचेंज’च्या रिसर्च ॲनालिस्ट रिया
सहगल यांच्या मते, बाजारात खरेदीदारांचा अभाव आणि
गुंतवणूकदारांमधील विश्वासाची कमतरता यामुळे विक्रीचा दबाव वाढला आहे.
वीकेंडदरम्यान कमी तरलतेच्या ट्रेडमध्ये २ अब्ज डॉलर्सहून अधिक
पोझिशन्स लिक्विडेट झाल्यामुळे किमती झपाट्याने घसरल्या. तसेच, जानेवारीमध्ये अमेरिकेतील स्पॉट बिटकॉइन ETFमधून १.६ अब्ज डॉलर्सचा नेट आऊटफ्लो झाला, यामुळे
संस्थागत गुंतवणूकदारांचा धोका टाळण्याचा कल स्पष्ट झाला आहे.
आर्थिक व राजकीय दबाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
केविन वॉर्श यांना फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी पसंती दिल्याच्या चर्चेमुळे
बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. वॉर्श हे कडक मौद्रिक धोरणांचे समर्थक मानले
जात असल्याने डॉलर मजबूत झाला आणि क्रिप्टोसारख्या जोखमीच्या मालमत्तांमधून
गुंतवणूकदारांनी माघार घेतली.
यासोबतच, इराणमधील अब्बास बंदरावरील स्फोट आणि अमेरिका–इराण तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून
गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तांकडे वळताना दिसत आहेत.
तांत्रिक स्थिती व पुढील अंदाज
तांत्रिक विश्लेषणानुसार बिटकॉइन अजूनही ८०,००० ते ८२,००० डॉलर्सच्या रेझिस्टन्स लेव्हलच्या
खाली आहे. आगामी काळात ते ७२,००० ते ७०,००० डॉलर्सपर्यंत
घसरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
एथेरियम २,५०० डॉलर्सच्या खाली स्थिर असून
पुढे २,००० डॉलर्सपर्यंत
घसरण्याचा धोका कायम आहे. आर्थिक स्थैर्य परत येईपर्यंत आणि ETFमधील गुंतवणूक वाढेपर्यंत क्रिप्टो बाजार संरक्षणात्मक भूमिकेत राहण्याची
शक्यता आहे.