ट्रेनमध्ये प्रसाद म्हणून गुंगीची चिक्की देऊन दाम्पत्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; सोलापूर लोहमार्ग पोलिसांची आरोपी महिलेला अटक

सोलापूर : रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ किंवा प्रसाद स्वीकारणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देणारी घटना समोर आली आहे. कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एका दाम्पत्याला प्रसाद म्हणून गुंगीचे औषध असलेली चिक्की खायला देऊन त्यांच्याकडील सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसादाच्या चिक्कीतून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप

गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोरे (वय ५९, रा. इटावा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिने रेल्वे प्रवासादरम्यान एका दाम्पत्याला प्रसाद म्हणून चिक्की दिली. या चिक्कीत गुंगीचे औषध असल्याचा आरोप आहे. चिक्की खाल्ल्यानंतर दाम्पत्य गुंगीत असताना त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. त्याची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

१५ सप्टेंबर रोजी घडली घटना

गोविंद व्यनकोबा कुमरा (रा. कर्नूल, आंध्र प्रदेश) यांनी याप्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वे प्रवास करत असताना ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी महिलेला ताब्यात

या गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून गीतादेवी हिला ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार लोहमार्ग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. चिक्कीमध्ये नेमका कोणता गुंगीकारक पदार्थ मिसळण्यात आला होता आणि तो कुठून आणला, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी करीत आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.