भारत-न्यूझीलंड चौथा टी-२० आज; अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे लक्ष, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?
ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून विजयाची लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात स्फोटक शतकी खेळी करणारा अभिषेक शर्मा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या फलंदाजीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. चौथ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी ईडन पार्क मैदानावर सराव केला. या वेळी एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार के. एल. राहुलही उपस्थित होते.
विजयी लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा निर्धार
चौथ्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना तिलक वर्माने भारतीय संघाची भूमिका स्पष्ट केली. सलग तीन सामने जिंकल्याचा आनंद असला, तरी संघाला समाधान नाही. उर्वरित दोन सामनेही जिंकून चांगली कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे त्याने सांगितले.न्यूझीलंड दौऱ्यावर येण्यापूर्वी भारतीय संघाला फारसा सराव मिळाला नव्हता. केवळ एका सराव सत्रानंतर पहिल्या सामन्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुरुवातीला काही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला देशासाठी खेळण्याची आणि कोणतीही सबब न देता आव्हान स्वीकारण्याची प्रेरणा दिली, असे तिलक वर्माने सांगितले.
दडपण स्वीकारून सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची
भारतीय संघाकडून खेळताना दडपण असतेच. मात्र, संघात आपले स्थान मजबूत करायचे असेल, तर हे दडपण स्वीकारून सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे, असे तिलक वर्माने स्पष्ट केले.मोठे फटके मारण्याबरोबरच वेगाने धावा घेणे आणि दोन धावा पूर्ण करण्याचे तंत्रही महत्त्वाचे ठरते. विजय मिळेपर्यंत मैदानावर टिकून राहण्याला आपण प्राधान्य देतो, असेही त्याने सांगितले.
ईडन पार्कवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची कसोटी
पहिल्या तीन सामन्यांतील पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतीय फलंदाजांना रोखण्यात यजमान संघाच्या गोलंदाजांना अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच ईडन पार्क मैदानावरील सीमारेषा तुलनेने जवळ असल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चिंता वाढली आहे.नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करण्याचा फायदा होऊ शकतो, असे मत न्यूझीलंडचा खेळाडू बेवॉन जेकब्स याने व्यक्त केले आहे.
क्षेत्ररक्षणालाही तिलक वर्माचे प्राधान्य
तिलक वर्माने फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणाबद्दलही आपले मत व्यक्त केले. झेल पकडून गोलंदाजांना मदत करणे किंवा प्रतिस्पर्धी संघाची एक धाव वाचवणे, यातून समाधान मिळते, असे तो म्हणाला. कर्णधाराने मोक्याच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केल्यास अभिमान वाटतो, असेही त्याने सांगितले.चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार की विजयी संघ कायम ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, अंतिम संघाची घोषणा नाणेफेकीच्या वेळीच स्पष्ट होईल.