अहिल्यानगरमध्ये ग्रामपंचायत महिला कर्मचाऱ्याची हत्या; प्रेमसंबंधातील संशयातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज
अहिल्यानगर : भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी
एका महिला कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अनिता देविदास आळकुटे
(वय ४२) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात
आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी संतोष नाना धोत्रे (वय ४९) याला
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांमधील प्रेमसंबंध आणि दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक
असल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातच हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वडारवाडी
ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली. अनिता आळकुटे या ग्रामपंचायतीत सफाई
कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी संशयित संतोष धोत्रे याने त्यांच्यावर
चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. डोक्यावर आणि गळ्यावर
गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस
ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.
दहा वर्षांच्या संबंधांतून वाद?
प्राथमिक माहितीनुसार, अनिता आळकुटे आणि संतोष धोत्रे यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. धोत्रे हा पत्नीपासून वेगळा राहत असून, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. अनिता यांचे पती निधन पावले होते. अनिता यांचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय धोत्रे याला आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. याच संशयातून हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यापूर्वीचा घटनाक्रम अद्याप तपासाधीन आहे.
संशयित पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी संतोष धोत्रे याला ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचा
मुलगा योगेश आळकुटे (वय २६) याची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची
माहिती देण्यात आली आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई
केली जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडल्याने
वडारवाडी आणि भिंगार परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण, घटनाक्रम
आणि इतर संबंधित बाबींचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे.