भरदुपारी खासदार पुत्राने ॲस्टन मार्टिनने महिलेला उडवलं; एफआयआर दाखल, मात्र अद्याप अटक नाही
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील जनसेना नेते आणि राज्यसभा खासदार
लिंगमनेनी रमेश यांच्या मुलाचा कार अपघात चर्चेत आला आहे. २१ वर्षीय लिंगमनेनी
संजुश याने चालवलेल्या Aston Martin कारने रस्ता ओलांडणाऱ्या २६
वर्षीय भारती मुखी यांना धडक दिल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. मिळालेल्या
माहितीनुसार, भारती मुखी या इनऑर्बीट मॉलमध्ये सेल्सगर्ल
म्हणून काम करत होत्या. त्या दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत
असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली.
महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत
या अपघातात भारती मुखी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
झाली. अपघातानंतर संजुश यांनी जखमी महिलेला त्याच Aston
Martin कारमधून अपोलो रुग्णालयात दाखल
केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित
केलं. भारती आणि त्यांची सहकारी जवळच्या हॉटेलमधून पार्सल घेऊन मॉलकडे परतत असताना
हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
FIR दाखल, मात्र अटक
नाही
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम
१०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. माधापूरचे सहाय्यक
पोलीस आयुक्त श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित
कलमे जामीनपात्र आहेत. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली असून कायदेशीर प्रक्रिया
सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात
खासदार पुत्राला अटक का करण्यात आलेली नाही, यावरून प्रश्न
उपस्थित होत असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.