१३ वर्षांत भारत किती बदलला? GTA 6 च्या निमित्ताने मोदींचा काँग्रेसवर निशाणा; पोस्ट व्हायरल
GTA 6 च्या निमित्ताने मोदींनी मांडला
भारताच्या प्रगतीचा लेखाजोखा
नवी दिल्ली : लोकप्रिय व्हिडिओ गेम GTA 6 च्या लॉन्चची जगभरात चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या
गेमचा आधार घेत भारताच्या गेल्या १३ वर्षांतील बदलांचा आढावा मांडला आहे. २०१३
मध्ये GTA 5 प्रदर्शित झाला होता, तर
आता १३ वर्षांनंतर GTA 6 लॉन्च झाला आहे. या दोन गेमच्या
लॉन्चमधील कालावधीचा संदर्भ देत मोदींनी २०१३ मधील भारत आणि आजच्या भारताची तुलना
केली आहे. 'India is playing a whole new game' अर्थात 'भारत आता एक वेगळाच खेळ खेळत आहे', असे म्हणत
त्यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यूपीए सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला
आहे.
GTA च्या पोस्टरच्या शैलीत भारताच्या
प्रगतीचे मुद्दे
पंतप्रधान मोदींच्या पोस्टमध्ये GTA गेमच्या पोस्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या खास फॉन्टचा वापर करण्यात आला आहे.
त्याद्वारे २०१३ मधील भारत आणि आजच्या भारतातील बदल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात
आला आहे. अर्थव्यवस्था, स्वच्छता, ऊर्जा,
संरक्षण आणि इंटरनेट यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीचे मुद्दे या
पोस्टमध्ये मांडण्यात आले आहेत.
'Fragile 5' मधून भारत बाहेर
भारताच्या आर्थिक स्थितीतील बदलाचा उल्लेख करताना
पोस्टमध्ये 'Fragile 5' या संकल्पनेचा संदर्भ देण्यात
आला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये मॉर्गन स्टॅन्लेच्या एका विश्लेषकाने हा शब्द वापरला
होता. आर्थिकदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या या गटात भारतासह ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या देशांचा
समावेश होता. परदेशी गुंतवणुकीवर अधिक अवलंबून असल्यामुळे जागतिक आर्थिक
घडामोडींचा या देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात
होती. मात्र, आज भारत या गटातून बाहेर पडून जगातील सर्वात
वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनला असल्याचे पोस्टमध्ये नमूद
करण्यात आले आहे.
स्वच्छता, सौरऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील
प्रगतीचा उल्लेख
देशातील स्वच्छता मोहिम, सौरऊर्जा निर्मिती क्षमतेत झालेली वाढ
आणि वीज पोहोचवण्याच्या कामातील प्रगती यांचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे. याशिवाय,
नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याचा आणि भारत संरक्षण साहित्याचा
महत्त्वाचा निर्यातदार म्हणून पुढे येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
इंटरनेटचा खर्च ३०८ रुपयांवरून ७.५१ रुपयांवर
इंटरनेटच्या किमतीतील बदल हा पोस्टमधील महत्त्वाचा मुद्दा
ठरला आहे. २०१३ मध्ये एक जीबी हायस्पीड इंटरनेटसाठी सुमारे ३०८ रुपये खर्च करावे
लागत होते. आता हाच खर्च कमी होऊन प्रति जीबी ७.५१ रुपये झाल्याचे पोस्टमध्ये नमूद
करण्यात आले आहे. GTA 6 च्या लॉन्चचा संदर्भ वापरून मोदींनी
सरकारच्या कामगिरीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
काही मिनिटांत पोस्टला हजारो लाईक्स
मोदींच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत
असल्याचे वृत्त आहे. पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत जवळपास ६० हजार
लाईक्स आणि २ हजार कमेंट्स मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक युजर्सनी पोस्टचे
कौतुक केले. एका युजरने 'आतापर्यंतचे सर्वात कूल पंतप्रधान'
अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी त्यांना
आपला आवडता इन्फ्लुएन्सर आणि 'OG क्रिएटर' असे म्हटले.
GTA 6 च्या लॉन्चची जगभरात चर्चा
दरम्यान, GTA 6 हा गेम गुरुवारी मध्यरात्री लॉन्च झाल्याचे वृत्त आहे. याआधी या मालिकेतील GTA 5 हा गेम २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे १३ वर्षांनंतर आलेल्या नव्या गेमबद्दल गेमर्समध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या गेमच्या निर्मितीसाठी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डिजिटल इंटेलिजन्स कंपनी सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार, गेमच्या प्री-ऑर्डरमधून आतापर्यंत सुमारे १.१ अब्ज डॉलरचा महसूल मिळाल्याचे वृत्त आहे. एकीकडे GTA 6 च्या लॉन्चची जगभरात चर्चा सुरू असताना, दुसरीकडे या गेमच्या लोकप्रियतेचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी भारताच्या १३ वर्षांतील बदलांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट गेमर्ससोबतच राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.