जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन, राजकीय चर्चांना उधाण
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत
राजकीय घडामोडींना वेग आला असून, जागावाटपावरून महायुतीतील घटक
पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी मुक्ताईनगर
आणि चोपडा येथील जागांचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी
फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना
उधाण आले आहे.
महायुतीतच जागावाटपावरून रस्सीखेच
राज्यात महायुतीचे सरकार असतानाही जळगाव जिल्हा बँकेच्या
निवडणुकीत वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा शिंदे गट काही जागांवर
वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय
साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दोन जागांवरील उमेदवारीचा पेच अद्याप
सुटलेला नाही.
आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची एक अशा एकूण चार
जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, मुक्ताईनगर आणि चोपडा
येथील जागांवरून राजकीय तणाव वाढला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी नेत्यांच्या बैठका
रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे
यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
या संवादातून नेमकी कोणती राजकीय समीकरणे जुळवली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय
राज्यमंत्री रक्षा खडसे हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात
उतरले आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची भूमिका निवडणुकीच्या पुढील
घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, मुक्ताईनगर आणि चोपडा येथील जागांचा पेच कायम असल्याने अंतिम निर्णय काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित फोन संवादानंतर या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना कोणते वळण मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.