पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भाविकांसाठी वस्त्रसंहितेचा प्रस्ताव; पारंपरिक पोशाखाला प्राधान्य

पंढरपूर (सोलापूर) : कोट्यवधी वारकरी आणि विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परदेशातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष वस्त्रसंहिता अर्थात ड्रेसकोड लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेसा पारंपरिक पोशाख परिधान करून येणाऱ्या परदेशी भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी थेट प्रवेश देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संदर्भात मंदिर समितीकडून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंदिरात परदेशी भाविकांसाठी नेमके कोणते नियम लागू होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी आणि वारकरी सल्लागार परिषदेचा ठराव

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वर्षभर देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळात पंढरीत भाविकांची मोठी गर्दी होते. परदेशातील नागरिकही विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला भेट देतात. या परदेशी भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा सन्मान राखणारा पोशाख परिधान करावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने विशेष ठराव मंजूर केला असून, तो विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पाठविण्यात आला आहे.

कसा असेल प्रस्तावित ड्रेसकोड?

प्रस्तावानुसार, परदेशी पुरुष आणि महिला भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी येताना भारतीय पारंपरिक किंवा वारकरी संप्रदायाला साजेसा पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. मात्र, पुरुष आणि महिलांसाठी नेमके कोणते कपडे मान्य असतील, पोशाखाबाबतचे निकष काय असतील आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

मंदिर समिती या सर्व बाबींचा विचार करून प्रमाणित कार्यपद्धती तयार करीत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वस्त्रसंहितेचे नेमके स्वरूप आणि अंमलबजावणीबाबत स्पष्टता येणार आहे.

अंतिम नियमांकडे भाविकांचे लक्ष

परदेशी भाविकांनी भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सन्मान राखणारा पोशाख परिधान करावा, या उद्देशाने हा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, वस्त्रसंहितेची अंमलबजावणी कधीपासून होणार आणि त्यात कोणते नियम असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर समितीच्या अंतिम निर्णयानंतरच परदेशी भाविकांसाठीच्या ड्रेसकोडचे चित्र स्पष्ट होणार आहे.