आषाढी वारीसाठी AI ड्रोन, अँटी-ड्रोन गन आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूम सज्ज; पंढरपुरात DIG जी. श्रीधर यांचा आढावा

आषाढी वारी 2026 दरम्यान सुमारे 25 ते 30 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांनी पंढरपूर येथे सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या व्यवस्थेमध्ये AI आधारित ड्रोन, अँटी-ड्रोन गन, फेस रिकग्निशन तंत्रज्ञान आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूमचा समावेश करण्यात आला आहे.

वारीदरम्यान भाविकांची गर्दी अचूकपणे मोजणे, गर्दीच्या ठिकाणांची तात्काळ माहिती प्रशासनाला देणे तसेच ड्रोनवरील साऊंड सिस्टमद्वारे भाविकांना सूचना देणे, अशी महत्त्वाची कामे AI ड्रोनद्वारे केली जाणार आहेत. याशिवाय, यात्रेदरम्यान खाजगी ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ड्रोनना निष्क्रिय करण्यासाठी अत्याधुनिक अँटी-ड्रोन गनचा वापर केला जाणार आहे. यामुळे भाविकांची सुरक्षा आणि वारीचे पावित्र्य अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूममधून विविध विभागांचे अधिकारी एकत्रितपणे यात्रेवरील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणार असून, भाविकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. तसेच, वारीमध्ये येणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगारांची AI आधारित फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे ओळख करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठीही विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.