नागपुरात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; मित्राला मारहाण करून पळवले, व्हिडिओची धमकी देत दागिने लुटले

नागपूर शहरातील सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासोबत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या तरुणीला एका अज्ञात तरुणाने धमकावून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. आरोपीने आधी तरुणीच्या मित्राला मारहाण करून तेथून पळवून लावले. त्यानंतर तरुणीचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

मित्राला मारहाण करून घटनास्थळावरून पळवले

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १९ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात गेली होती. दोघेही जंगलातील एका निर्जन ठिकाणी बसले असताना अचानक एक तरुण तेथे पोहोचला. आरोपीने दोघांचा पाठलाग करून त्या ठिकाणी आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेथे पोहोचल्यानंतर त्याने तरुणीच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीतून बचाव करण्यासाठी तरुणीच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणी एकटी पडली.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचाराचा आरोप

मित्र निघून गेल्यानंतर आरोपीने तरुणीला धमकावत शारीरिक संबंधांची मागणी केली. तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने तरुणीचे काही व्हिडिओ बनवल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.

कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात तक्रार

घटनेनंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी कुटुंबीयांसह सोनेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सोनेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके कामाला लागली आहेत. अमराई जंगल परिसरात येण्या-जाण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

अमराई जंगल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील काही भाग निर्जन आणि अंधारात असल्याने तेथे संशयास्पद व्यक्तींचा वावर असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या भागात नियमित पोलीस गस्त वाढवावी, प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करावी तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.