‘शुभम दादाच्या खुनाचा बदला घेतला’; पुणे सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला
पुणे : शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी
मंदार किवळे याच्यावर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना
समोर आली आहे. ‘शुभम दादाच्या खुनाचा बदला घेतला’ अशी घोषणा देत हल्लेखोरांनी हा
हल्ला केल्याचे मंदारने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेमुळे
न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
गोळीबाराचा प्रयत्न फसला; त्यानंतर कोयत्याने वार
मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून
बुधवारी तो या प्रकरणातील पहिल्या सुनावणीसाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयात जात
होता. दुपारी न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर चार ते पाच जणांनी त्याला अडवले.
फिर्यादीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्याजवळ येऊन ‘तूच
आमच्या शुभमला मारलं ना?’ असा सवाल केला.
यानंतर दोघांनी हातातील पिस्तुलातून गोळी झाडण्याचा
प्रयत्न केला. मात्र, गोळी मंदारला लागली नाही. त्याचवेळी
दुचाकीवर बसलेल्या एका व्यक्तीने ‘याच्या डोक्यात कोयते टाका,’ असे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी मंदारवर
कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.
‘शुभम दादा, तुझ्या
खुनाचा बदला घेतला’
हल्ल्यानंतर आरोपींनी ‘शुभम दादा, तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे,’ अशी घोषणा
दिल्याचे मंदारने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच ‘आम्हीच कात्रजचे राजे आहोत,’
असे म्हणत हल्लेखोरांनी हातातील कोयते हवेत फिरवले आणि
घटनास्थळावरून पळ काढला.
नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नऊ
जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याची
आणि घटनेचा पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे. शुभम चव्हाण हत्या प्रकरणाच्या
पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने पुण्यातील टोळीयुद्धाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला
आहे.
न्यायालयाने घेतली घटनेची गंभीर दखल
शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात झालेल्या
गोळीबाराच्या प्रयत्न आणि कोयता हल्ल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पुणे
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी न्यायालय परिसरातील सुरक्षा आणि
कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना
बोलावले आहे. न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा होणार
असल्याचे वृत्त आहे.