सोलापूरकरांना रोज पाणी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; १,३५० कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
सोलापूर : शहरातील नागरिकांना नियमित आणि दररोज
पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सुमारे १,३५० कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र राज्याच्या
उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती
दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस.
कार्तिकेयन, महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष
रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, अविनाश
महागावकर आणि अजिंक्यराणा पाटील उपस्थित होते.
दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारणार
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्या अनेक
वर्षांपासून चर्चेत आहे. शहराला नियमित आणि २४ तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. या
योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने आता महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या सुधारित
योजनेअंतर्गत जागतिक बँकेच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोन नवीन
जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच शहरात ३० नवीन जलकुंभ बांधण्यात
येणार असून, सुमारे १,२२७ किलोमीटर
लांबीचे अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
२ लाख ३८ हजार नवीन नळजोडण्या
योजनेत शहरातील नागरिकांना मीटरसह सुमारे २ लाख ३८ हजार
नवीन पाणी जोडण्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्था
अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
८० कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प
या पाणीपुरवठा योजनेत सुमारे ८० कोटी रुपयांच्या सौर
ऊर्जा प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज
खर्चात सुमारे २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, पाणीपुरवठा योजनेच्या संचालनावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याची माहिती
या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार देवेंद्र
कोठे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले. योजनेच्या मार्गातील
विविध अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी
सांगितले. सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने सोलापूर शहरातील
नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता
प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कामांचा वेग याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.