हिंजवडीत प्रेमसंबंधातून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची हत्या; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

पुणे : हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे (रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव असून शुभम ज्ञानेश्वर काळभोंडे (रा. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांची संमतीही होती.

दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याच्या संशयातून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याचा संशय कोमलला होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी दोघे एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर साकोरे वस्ती येथील कोमलच्या पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानी परतल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

वादातून हल्ला; तरुणीचा मृत्यू

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी शुभमने कोमलवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने मृतदेहाशेजारीच संपूर्ण रात्र काढल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम काळभोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांमधील वादाचे नेमके कारण आणि हत्येमागील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.