ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मजुरांवर हल्ला; दोन महिला गंभीर जखमी
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे ऊसतोड सुरू असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन महिला मजुरांवर हल्ला केला. रविवारी (दि. २२) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये एकच पळापळ उडाली. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी नाशिक येथील बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. जखमी महिलांची नावे सोन्याबाई ज्ञानेश्वर राठोड (वय २५) आणि योगिता अर्जुन जाधव (वय ३०) अशी आहेत. दोघीही चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी आहेत.
२० ते २५ मजुरांमध्ये उडाली पळापळ
वडांगळी-तामसवाडी रस्त्यालगत शांताराम सैंद यांच्या मालकीच्या शेतात
२० ते २५ मजूर ऊसतोडणीचे काम करीत होते. पुरुष मजूर ट्रॅक्टरमध्ये उसाच्या मोळ्या
रचत होते, तर
महिला ऊस तोडत होत्या. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक महिलांवर
हल्ला चढविला. अनपेक्षित हल्ल्यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि
सर्वांची एकच पळापळ झाली.
दोन्ही महिलांना गंभीर जखमा
या हल्ल्यात सोन्याबाई राठोड यांच्या गुडघा, कंबर आणि पाठीवर बिबट्याच्या नखांनी खोलवर जखमा केल्या. तर योगिता जाधव यांच्या डोक्याला आणि उजव्या दंडाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक दीपाली सदावर्ते, मधुकर शिंदे तसेच वन्यजीव रक्षक रोहित लोणारे आणि निखिल वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी महिलांना तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हल्ल्यानंतरही बिबट्याचा परिसरात वावर
दोन महिलांवर हल्ला केल्यानंतरही बिबट्याने परिसर सोडलेला नसल्याचे समोर आले आहे. शेतातील कामगारांनी केलेल्या चित्रीकरणात हल्ल्यानंतरही बिबट्या परिसरात फिरताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी याच परिसरात नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पुन्हा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये चिंता वाढली आहे. वनविभागाने परिसरात सतर्कता ठेवून मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.