घरी बसून QR कोडद्वारे ई-केवायसी करा; गॅस एजन्सीसमोर गर्दी टाळा – जिल्हाधिकारी कार्तिकेयन
सोलापूर : शहरात गॅस एजन्सीसमोर ई-केवायसी आणि सिलेंडर
बुकिंगसाठी होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी
नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीवर रांगा लावण्याऐवजी
घरी बसून क्यूआर कोडद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यात एलपीजी, पेट्रोल
आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या एकूण २०
गॅस एजन्सी कार्यरत आहेत. सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर एजन्सीसमोर गर्दी करत
असल्याने प्रशासनाने ही सूचना जारी केली आहे. गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबतही
वेळापत्रक स्पष्ट करण्यात आले आहे. शहरी भागात एक सिलेंडर धारकांना २५ दिवसांत,
डबल कनेक्शन धारकांना ३५ दिवसांत, तर ग्रामीण
भागात ४५ दिवसांत सिलेंडर पुरवठा केला जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या
तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तक्रार निवारण केंद्र सुरू केले असून,
पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी येथे
नियुक्त करण्यात आले आहेत. ई-केवायसी प्रक्रियेसाठी संबंधित कंपन्यांची अधिकृत
मोबाईल अॅप्स डाउनलोड करून आधार फेस ओळखीद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून ऑनलाइन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अन्नधान्य वितरण
कार्यालयाच्या 0217-27311008 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क
साधावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.