टी-२० वर्ल्ड कप २०२६: भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या
सुपर-८ फेरीत भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव
केला. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने केवळ विजयच
मिळवला नाही, तर आपल्या
नेट रनरेटमध्येही मोठी वाढ केली. या पराभवामुळे झिम्बाब्वेचे सेमीफायनलचे स्वप्न
जवळपास संपुष्टात आले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २०
षटकांत ४ बाद २५६ धावांचा भक्कम डोंगर उभारला. २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग
करताना झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. सलामीवीर
ब्रायन बेनेटने ९७ धावांची झुंजार आणि नाबाद खेळी केली, तर
कर्णधार सिकंदर रझाने ३१ धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. भारतीय
गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत झिम्बाब्वेच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवले.
अर्शदीपने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर अक्षर पटेलने
महत्त्वाच्या क्षणी सलामीची जोडी फोडली. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी
प्रत्येकी एक बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फलंदाजीत अभिषेकने ३०
चेंडूत ५५ धावांची आक्रमक खेळी करत दमदार सुरुवात दिली. त्यानंतर हार्दिक पंड्याने
अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावत ‘फिनिशर’ची भूमिका समर्थपणे पार पाडली. तिलक
वर्माने १६ चेंडूत नाबाद ४४ धावा करत धावसंख्येला वेग दिला. भारताच्या या
सर्वांगीण कामगिरीमुळे सेमीफायनलच्या दिशेने संघाने ठोस पाऊल टाकले आहे.