वैष्णवी आवारे हत्या प्रकरणाचा उलगडा; दुसरीकडे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने केली हत्या, नंतर आत्महत्या
नाशिक : इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणाऱ्या वैष्णवी आवारे
(वय २४) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर
आली आहे. वैष्णवीचे दुसऱ्या युवकासोबत लग्न ठरल्याचा राग मनात धरून तिचा माजी
प्रियकर साहिल लावारे याने तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर
काही तासांतच साहिलचा मृतदेह इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला गळफास
घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, वैष्णवी आणि तक्रारदार युवकाचे लग्न ठरण्याची प्रक्रिया सुरू होती.
यापूर्वी साहिल लावारे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध आणि लिव्ह-इन रिलेशनशिप
असल्याची माहिती वैष्णवीने तक्रारदाराला दिली होती. त्यानंतर साहिलकडून तिला
वारंवार फोन करून त्रास दिला जात असल्याचेही तिने सांगितले होते.
घटनेच्या दिवशी रात्री साहिलने तक्रारदाराला फोन करून
वैष्णवीला स्वतःकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर वैष्णवी आणि साहिल
यांच्यात फोनवर सुमारे २२ मिनिटे वाद सुरू होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, फोनवर जोरदार भांडणाचे आवाज ऐकू येत होते आणि शेवटी "वैषूला आज संपवलं" असे शब्द ऐकल्यानंतर फोन
बंद झाला.
तक्रारदार घटनास्थळी पोहोचले असता वैष्णवी रक्ताच्या
थारोळ्यात पडलेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. काही
तासांनंतर साहिल लावारे याचा मृतदेह जॉगिंग ट्रॅक परिसरातील झाडाला गळफास
घेतलेल्या अवस्थेत आढळला. इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, घटनाक्रम आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अधिक माहिती समोर येण्याची
शक्यता आहे.