आषाढी वारीनिमित्त सोलापुरात श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी व संत श्री गजानन महाराज पालखी भेटीचा ऐतिहासिक सोहळा १८ जुलैला

सोलापूर : आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त सोलापुरातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज आणि श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखी भेटीचा ऐतिहासिक सोहळा शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही परंपरा सोलापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेतील अत्यंत मानाचा सोहळा मानली जाते. या प्रसंगी दोन्ही संतांच्या पादुकांचे पूजन, आरती, पुष्पवृष्टी, हरिनाम संकीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी भेटीचा दिव्य सोहळा पार पडणार आहे.

श्रीक्षेत्र शेगाव येथून येणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंदिरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी संत श्री गजानन महाराजांना प्रिय असलेला पिठलं-भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जाईल. त्यानंतर प्रथम शेगावहून आलेल्या वारकरी भाविकांना आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात प्रशस्त वॉटरप्रूफ शेड, दोन भव्य एलईडी स्क्रीन तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेगावहून येणाऱ्या वारकऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी शनिवार, दि. १८ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचे नियमित दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सोलापूर शहर, परिसर तसेच महाराष्ट्रभरातील वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी केले आहे.