ISROच्या गगनयान-चंद्रयान मोहिमेतील शास्त्रज्ञांचे राजीनामे; सरकारने नियम केले कडक

नवी दिल्ली : भारत सरकारच्या अंतराळ विभागाने (Department of Space) इस्रोच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गगनयान मोहीम आणि इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या अंतराळ प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्ती (VRS) अर्ज थेट स्वीकारू नयेत, असे निर्देश सर्व इस्रो केंद्रांना देण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार, अशा सर्व प्रकरणांचा अंतिम निर्णय अंतराळ विभागाकडून घेतला जाणार आहे. देशाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांवर मनुष्यबळाच्या कमतरतेचा परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडच्या काळात इस्रोमधील अनुभवी शास्त्रज्ञ आणि तरुण अभियंते अधिक वेतन, जलद पदोन्नती, चांगले कार्यपरिसर आणि खाजगी अवकाश कंपन्यांमधील संधीमुळे संस्था सोडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या गंभीर बनत असल्याचे मानले जात आहे.

गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून, तिच्या यशासाठी अनुभवी आणि कुशल वैज्ञानिकांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या प्रकल्पांतील तज्ज्ञ कर्मचारी अचानक बाहेर पडल्यास मोहिमांच्या वेळापत्रकावर आणि संशोधनावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, तज्ज्ञांचे मत आहे की केवळ निर्बंध लावून ही समस्या सुटणार नाही. शास्त्रज्ञांना अधिक चांगले वेतन, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी, संशोधनासाठी आवश्यक सुविधा आणि सकारात्मक कार्यसंस्कृती उपलब्ध करून दिल्यास इस्रोमध्ये प्रतिभावान मनुष्यबळ टिकवून ठेवणे अधिक शक्य होईल.