बोअरवेलची वायर चोरीचा आरोप; तीन अल्पवयीन मुलांना खांब-झाडाला बांधून अमानुष मारहाण, लातूरातील व्हिडीओ व्हायरल

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोला गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोअरवेलची वायर चोरी केल्याचा आरोप करत तीन अल्पवयीन मुलांना खांब आणि झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुलांना पत्र्याच्या शेडच्या खांबाला, तर एका मुलाला झाडाला बांधलेले दिसते. त्यानंतर एका व्यक्तीकडून त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि दोरीने बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसून येते. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या मुलांवर शेतातील बोअरवेलची वायर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी स्वतःच शिक्षा देत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित घटनेची दखल घेत पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.