"मी निर्दोष आहे, मला खोट्या प्रकरणात अडकवलं"; राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमचा सर्वोच्च न्यायालयात दावा

मेघालयातील चर्चित राजा रघुवंशी हनीमून हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आपल्याला खोट्या आरोपांखाली गोवण्यात आल्याचे तिने न्यायालयाला सांगितले आहे. मेघालय पोलिसांनी सोनमला उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावेळी जामिनाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत सोनमला नोटीस बजावून तिचा जामीन का रद्द करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागितले होते.

प्रतिज्ञापत्रात सोनमने म्हटले आहे की, फिर्यादी पक्षाने केवळ संशय आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तिच्याविरोधात आरोप केले आहेत. कोणालाही केवळ आरोपांच्या आधारावर दोषी ठरवता येत नाही, असेही तिने स्पष्ट केले. सोनमने न्यायालयाला सांगितले की, जामीन मिळाल्यापासून तिने न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन केले आहे. तपासापासून ते न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पूर्ण सहकार्य केले असून, खटल्याच्या विलंबासाठी तिला जबाबदार धरता येणार नाही.

तिने पुढे म्हटले आहे की, २७ एप्रिल २०२६ रोजी तिला जामीन मंजूर झाला आणि २८ एप्रिल रोजी तिची तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे आता पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. सोनमने आपल्या प्रतिज्ञापत्रात असेही नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून तपासाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची किंवा तपासावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून, जामीन कायम राहणार की रद्द होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.