सोलापुरातील ९ हजार कुटुंबांना मालकी हक्काचा दिलासा; बी-२ जमिनी बी-१ करण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर :- सोलापूर शहरातील वर्ग-२ (बी-२) जमिनींवरील सुमारे ९ हजार कुटुंबांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण सकारात्मक निर्णय झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत बी-२ जमिनींचे बी-१ मध्ये रूपांतर करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार सोलापूरसाठी विशेष प्रस्ताव तयार करून तो राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सोलापूरातील अनेक जुन्या चाळी आणि वसाहतींमध्ये बी-२ जमिनींमुळे नागरिकांना मालकी हक्क, बँक कर्ज, खरेदी-विक्री, पुनर्विकास, वारसा नोंदणी यांसारख्या व्यवहारांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे या सर्व प्रक्रियांना गती मिळणार आहे.

बैठकीत राज्यातील इतर भागांप्रमाणे २५ टक्के रूपांतरण शुल्क न आकारता सोलापूरसाठी विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवासी मालमत्तांसाठी केवळ २.५ टक्के आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी ५ टक्के रूपांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तसेच रूपांतरण शुल्काची गणना सध्याच्या रेडीरेकनर दराऐवजी १९८९ सालच्या रेडीरेकनर दरानुसार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक लाभ शहरातील सुमारे ९३ वर्षे जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना होणार आहे. जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारे चाळ, लक्ष्मी-विष्णू मिल चाळ, जुनी पोलीस लाईन, जुनी मिल कंपाऊंड आणि कर्णिक नगर परिसरातील हजारो कुटुंबांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या माध्यमातून सोलापूरातील बी-२ मिळकतधारकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.