पोहण्याचा मोह अंगलट; गाडेश्वर धरणात दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता
नवी मुंबई जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान
पनवेल तालुक्यातील धोधाणी परिसरातील गाडेश्वर धरणात रविवारी दुर्दैवी घटना घडली.
पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा अंदाज न
आल्याने ते वाहून गेले. या दुर्घटनेत सुमित यशवंत पवार याचा मृत्यू झाला असून नयन
म्हात्रे अद्याप बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दहा मित्रांचा एक गट धोधाणी येथील वाघाची वाडी परिसरात फिरण्यासाठी
गेला होता. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असतानाही काही तरुण पोहण्यासाठी
पाण्यात उतरले. त्यावेळी सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे दोघेही वेगवान प्रवाहात
वाहून गेले. घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी जीवाची पर्वा न करता लाकडी बांबूच्या
साहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओही
समोर आला आहे. अथक प्रयत्नांनंतर सुमित पवार याला बाहेर काढण्यात यश आले आणि
तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे
नयन म्हात्रे याचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस, स्थानिक
प्रशासन आणि बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. मात्र सततचा मुसळधार
पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल हवामानामुळे
शोधकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे विचुंबे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना पावसाळ्यात नद्या, धरणे,
धबधबे आणि ओढ्यांमध्ये पोहणे अथवा पाण्यात उतरणे टाळण्याचे आवाहन
केले आहे.