एसआयआर मोहिमेत सहभागी व्हा; मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी अर्ज भरा : आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मतदार यादी पुनर्नरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी विविध भागांना भेट देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मिळालेल्या शासकीय सुट्टीच्या दिवशी त्यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिकांशी संवाद साधून मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने अर्ज भरण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, शासनाच्या मतदार यादी पुनर्नरीक्षण मोहिमेद्वारे केंद्रस्तरीय अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. या प्रक्रियेत दुबार नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंद करणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम केले जात आहे. ते म्हणाले की, शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांमुळे अनेक नागरिक स्थलांतर करतात. त्यामुळे मतदार यादीत चुकीची नावे राहणे, नाव वगळले जाणे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असणे, जन्मतारीख किंवा नावातील चुका, तसेच मयत मतदारांची नावे कायम राहणे अशा अनेक त्रुटी निर्माण होतात. या सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी एसआयआर मोहीम महत्त्वाची आहे.

आमदार कोठे यांनी स्पष्ट केले की, नियमित मतदान करणाऱ्या मतदारांनीही एसआयआरचा अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतरच अंतिम मतदार यादीत नाव कायम राहणार असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतःसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे अर्ज भरावेत, असे त्यांनी आवाहन केले.

या मोहिमेदरम्यान भाजपाचे कार्यकर्ते नागरिकांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील १२ मतदान केंद्रांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहर मध्य विधानसभेचे एसआयआर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेविका राजश्री दोडमनी, ॲड. शैलेश पोटफोडे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, गोपाळ मिस्किन, मनोज पिसके, विजय महिंद्रकर, विश्वनाथ प्याटी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याच भेटीदरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील विकासकामांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना देखभाल व दुरुस्तीबाबत सूचना देत आगामी काळात आवश्यक विकासकामे प्रस्तावित करून पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.