मुंबई-पुणे प्रवास टाळा! मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस वे आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई-पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा घाट परिसरात दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेला तब्बल १६ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच ९ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून रेल्वे प्रशासनाकडून रुळांवरील माती आणि दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ डोंगराचा काही भाग घसरल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली-खंडाळा घाटातही दरडी कोसळल्याने वाहतूक अत्यंत संथ झाली आहे.

हवामान विभागाने ४ ते ७ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा, पालघर आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत २०० ते २५० मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शासनाचे हवामानविषयक अलर्ट तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिस्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक गरज नसल्यास मुंबई-पुणे प्रवास टाळावा, असे सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), हायवे पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी मदतकार्य करत असून रस्ते व रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास पुढे ढकलण्याचे तसेच अधिकृत वाहतूक व हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.