लेकरांना झोपवण्याच्या बहाण्याने बाहेर नेले; आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत संपवले जीवन

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील घेरडी गावात बुधवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून २८ वर्षीय वैष्णवी आशिष यमगर यांनी आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. मृतांमध्ये वैष्णवी आशिष यमगर (वय २८), तेजश्री आशिष यमगर (वय साडेतीन महिने) आणि रुद्राक्ष आशिष यमगर (वय १५ महिने) यांचा समावेश आहे. माहितीनुसार, बुधवारी रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करत असताना वैष्णवी यांनी दोन्ही मुलांना "झोपवते" असे सांगून घराबाहेर नेले. बराच वेळ उलटल्यानंतर त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यावेळी घराजवळील विहिरीत वैष्णवी यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर रात्री उशिरा दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेहही विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

आशिष यमगर हे मुंबईत ट्रेलर चालक म्हणून काम करतात. कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त ते कुटुंबासह गावी आले होते. याच काळात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याचे सांगितले जात आहे. वैष्णवी यांच्या आई-वडिलांनीही दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची माहिती वैष्णवी यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर घेरडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, दोन निष्पाप चिमुकल्यांसह आईने आयुष्य संपवल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.