पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप; विजयपूर न्यायालयाचा निकाल, ₹1 लाखांचा दंड
विजयपूर :- विजयपूर शहरातील पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने
महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी रफीक अस्तगीरसाब बलगानूर याला जन्मठेपेची
शिक्षा आणि ₹1 लाखांचा दंड ठोठावला
आहे. पत्नीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप न्यायालयात
सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. प्रकरणातील माहितीनुसार, जलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर येथे भाड्याच्या घरात
राहणारा रफीक बलगानूर हा पत्नी परवीन हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा
सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. यापूर्वी समाजातील ज्येष्ठांनी पंचायत घेऊन
त्याला समज दिली होती. मात्र, त्याच्या वागण्यात कोणताही बदल
झाला नव्हता.
तपासानुसार, १७ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून २०
ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरोपीने धारदार
शस्त्राने पत्नीच्या मानेवर, छातीवर, पाठीवर
आणि खांद्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या
उद्देशाने घराला कुलूप लावून तो फरार झाला. या प्रकरणी जलनगर पोलिसांनी
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२ (खून) आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून
न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी विजयपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश
ए. यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि
अन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष
काढला. त्यानुसार ३० जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी रफीक बलगानूर याला जन्मठेपेची
शिक्षा तसेच ₹1,00,000 दंड अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याची नोंद तत्कालीन पीएसआय एन. एस. जनगौडा यांनी केली होती. तपास सीपीआय
बसवराज यलगार आणि सीपीआय सुनील कांबळे यांनी केला. न्यायालयात
साक्षीदार हजर करण्याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल जे. पी. पवार यांनी पार
पाडली, तर
सरकारतर्फे प्रधान सरकारी अभियोक्ता एस. एच. हकीम यांनी प्रभावी बाजू
मांडली.