बाळासाहेब सरवदे खून प्रकरण : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयातून जामीन

सोलापूर : बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शंकर शिंदे (रा. जोशी गल्ली, सोलापूर) यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती मेहरूज पठाण यांनी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

प्रकरणातील फिर्यादीनुसार, मयत बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते. त्यांच्या चुलत वहिनी रेखा सरवदे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच प्रभागातून शालन शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. फिर्यादीच्या आरोपानुसार, २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी आरोपींनी रेखा सरवदे यांच्या घरी जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी हनुमान मंदिराजवळ बाळासाहेब सरवदे, बाजीराव सरवदे आणि आदित्य सरवदे उभे असताना काही आरोपींनी शस्त्रांसह येऊन हल्ला केला. फिर्यादीनुसार, शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, तर इतर आरोपींनी तलवार व कोयत्याने वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासादरम्यान शालन शिंदे यांना अटक केली होती. यापूर्वी शालन शिंदे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अॅड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. रितेश थोबडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल झाले असून, सुरुवातीची अपघाती मृत्यूची नोंद, नेत्रसाक्षीदारांचे जबाब आणि फिर्यादीचे निवेदन यामध्ये विसंगती असल्याचा मुद्दा मांडला. या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने शालन शिंदे यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. ए. ए. टक्कळकर यांनी, तर आरोपीतर्फे अॅड. रितेश थोबडे यांनी काम पाहिले.