संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल का झाला? अटकेवेळी पोलिसांसोबत नेमकं काय घडलं?
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर टीका करणारे व्हिडीओ सोशल
मीडियावर पोस्ट करणारे यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी अटक
केली आहे. विकासकामांबाबतच्या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी
केल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रात्री पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास पोलिसांचे पथक दोन
गाड्यांमधून संतोष पंडित यांच्या राहत्या घरी पोहोचले. या पथकातील काही पोलिस
कर्मचारी साध्या वेशात होते. त्यानंतर पोलिसांनी पंडित यांना ताब्यात घेतले. अटकेची
कारवाई सुरू असताना त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ शूट केला.
पोलिस त्यांना गाडीत बसवत असताना संतोष पंडित यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली.
"आमच्या घरात रात्री पोलीस घुसतात..."
गाडीत बसण्यापूर्वी संतोष पंडित यांनी पोलिसांसमोर नाराजी व्यक्त
केली.
"आमच्या घरात रात्री साडेबारा-एक वाजता पोलीस घुसतात.
आमच्यासारख्यांची हीच लायकी आहे," असे ते
म्हणाल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. यानंतर त्यांनी पोलिसांकडे माफीही मागितली.
"माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल तर माफी मागतो. अटक
केल्याबद्दल धन्यवाद," असे पंडित यांनी म्हटले. गाडीत
बसण्यापूर्वी त्यांनी आपला मोबाईल, गाडीची किल्ली आणि कमरेचा
पट्टा कुटुंबीयांकडे दिला. या संपूर्ण कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
झाला आहे.
संतोष पंडित यांच्यावर गुन्हा का दाखल झाला?
संतोष पंडित हे पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांमधील त्रुटींवर
व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी उच्च
व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि
शिवराळ भाषेचा वापर असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी
भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक सुनील पांडे यांनी तक्रार दाखल केली होती.
मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानंतर डेक्कन
पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, संतोष
पंडित यांच्यावर झालेल्या कारवाईमागील नेमकी कायदेशीर कारणे आणि त्यांच्यावर
लावण्यात आलेली कलमे याबाबत पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.