पुण्यात तरुण भररस्त्यात पोलिसांच्या अंगावर धावला; नशेत दादागिरी, नंतर माफी मागत म्हणाला...

पिंपरी-चिंचवड : दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात केल्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांशी अरेरावी आणि दमदाटी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता हा प्रकार घडला. शशांक प्रशांत खानवलकर हा तरुण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे सांगण्यात आले. त्याने एका वाहनाला धडक दिल्यानंतर त्याची कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.

अपघातानंतर पोलिसांशी अरेरावी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवू नये, अशी समज पोलिसांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेतील शशांकने पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याने पोलिसांना अरेरावी करत तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे’ अशा शब्दांत आव्हान दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित तरुण पोलिसांशी वाद घालताना आणि त्यांच्यावर आरोप करताना दिसत आहे. त्याने पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पोलिसांकडून कायदेशीर कारवाई

वाकड पोलिसांनी शशांक खानवलकर याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून त्याला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. या घटनेनंतर मात्र काही तासांतच परिस्थिती बदलली. नशा उतरल्यानंतर आपल्या कृत्याची जाणीव झाल्याचे सांगत शशांकने पोलिसांची जाहीर माफी मागितली.

माझ्याकडून अनावधानाने झालं’

माफी मागताना शशांकने सांगितले की, मी जे बोललो ते अनावधानाने झालं. पोलीस माझ्या मदतीसाठी तिथे आले होते. माझ्याकडून पोलिसांबाबत जे वक्तव्य झालं त्यासाठी मी माफी मागतो. यानंतर मी कधीही असं करणार नाही.’ पोलिसांसमोर दादागिरी करत कमिश्नरला बोलावण्याचे आव्हान करणारा तरुण काही तासांतच माफी मागताना दिसल्याने या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

दारूच्या नशेत कायदा हातात घेण्याचा प्रश्न

या घटनेमुळे दारूच्या नशेत वाहन चालवणे आणि त्यानंतर कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांशी गैरवर्तन करणे आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ किंवा दमदाटी करणे गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे.