उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; घरावर कोसळला मातीचा ढिगारा, २ महिला आणि चिमुकल्याचा मृत्यू

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. अल्मोडा जिल्ह्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसादरम्यान आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. हवालबाग ब्लॉकमधील उडयुडा गावात घरावर चिखल-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने दोन महिला आणि एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घरावर कोसळला मातीचा ढिगारा

मुसळधार पावसानंतर अचानक भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल घरात घुसला. या ढिगाऱ्याखाली घरातील नागरिक दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव पथकांना घटनास्थळी रवाना केले. सोमेश्वरच्या तहसीलदार नेहा धपोला यांनी या घटनेची माहिती देताना उडयुडा गावात अचानक आलेल्या चिखलाच्या ढिगाऱ्याखाली एक घर दबले असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला.

SDRF आणि पोलिसांकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती असतानाही जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी पथकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचा धोका वाढला

सततच्या पावसामुळे अल्मोडासह उत्तराखंडमधील अनेक पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढला आहे. संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी पावसाच्या काळात भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे उडयुडा गावावर शोककळा पसरली असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील पर्वतीय भागांमध्ये निर्माण झालेल्या धोक्याची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे.