E20 सोबत E10 पेट्रोलही मिळणार? जुन्या वाहनांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय होण्याची शक्यता
E20 पेट्रोलच्या वापरामुळे जुन्या वाहनांचे
मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना आता वाहनधारकांसाठी
दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये E20
सोबत E10 पेट्रोलचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून
देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
एप्रिल २०२३ पूर्वी तयार झालेली अनेक वाहने E10 इंधनाच्या मानकानुसार बनवण्यात आली होती. मात्र सध्या पेट्रोल पंपांवर
प्रामुख्याने E20 पेट्रोल उपलब्ध असल्याने जुन्या वाहनांच्या
मालकांसमोर इंधनाचा पर्याय मर्यादित झाला आहे. E20 पेट्रोल
वापरल्यामुळे काही जुन्या वाहनांमध्ये मायलेज कमी होणे तसेच रबर आणि प्लास्टिकच्या
घटकांवर परिणाम होण्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून करण्यात येत आहेत.
मुख्य आर्थिक सल्लागारांचा पुढाकार
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन
यांनी एका लेखातून जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देण्याची
शिफारस केली आहे. जुन्या वाहनधारकांना E10 आणि E20 अशा दोन्ही प्रकारच्या पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असा त्यांचा सल्ला आहे.
कोट्यवधी जुन्या वाहनधारकांना फायदा?
१ एप्रिल २०२३ नंतर विक्री झालेली BS6
Phase-2 मानकांची वाहने E20 इंधनासाठी सुसंगत
आहेत. मात्र त्यापूर्वी खरेदी केलेल्या मोठ्या संख्येने वाहनांचे आयुष्य अजून अनेक
वर्षे शिल्लक आहे. त्यामुळे जुन्या वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता आणि सुरक्षितता
लक्षात घेता E10 पेट्रोलचा पर्याय पुन्हा उपलब्ध करण्याबाबत
सरकार आणि तेल कंपन्यांकडून विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध झाल्यास जुन्या
वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.