दहिटणेत वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर; शेकडो भाविकांना औषधोपचार आणि मार्गदर्शन

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

वैराग (प्रतिनिधी) : 'साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' या संतवचनाचा आध्यात्मिक प्रत्यय मौजे दहिटणे येथे आला. श्री संत गोरोबा काका यांच्या कार्तिकी पालखी सोहळ्याचे गावात आगमन आणि मुक्काम झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामात तल्लीन झालेले वारकरी यामुळे गावाला भक्तीच्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भक्तिमय सोहळ्यात वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्याचे कार्य आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. आरोग्य केंद्र तडवळे अंतर्गत येणाऱ्या दहिटणे आरोग्य उपकेंद्राच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

श्री क्षेत्र वाणेवाडी ते पंढरपूर असा पायी पालखी सोहळा मागील अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. श्रद्धा, निष्ठा आणि विठ्ठलभक्तीची ऊर्जा सोबत घेऊन शेकडो वारकरी या वारीत सहभागी होतात. मात्र, अनेक किलोमीटरचा पायी प्रवास, बदलते हवामान, थकवा आणि शारीरिक श्रम यांमुळे वारकऱ्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. ही गरज लक्षात घेऊन मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच आवश्यक औषधोपचारही करण्यात आले. या शिबिराचा शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला.

वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे आणि डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी शिवाजी आवारे, पांडुरंग गावसाने (सुर्डी), आशा सेविका अश्विनी काशीद आणि रोहिणी घडमोडे यांनी वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविली. या उपक्रमातून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या सेवेचा आदर्श निर्माण केला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत सेवा हीच साधना आणि परोपकार हाच परमार्थ मानला जातो. वारकऱ्यांच्या पायातील थकवा दूर करणे, त्यांच्या वेदनांवर उपचार करणे आणि पुढील प्रवासासाठी आरोग्याची काळजी घेणे, हेही विठ्ठलभक्तीचेच एक रूप असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.

'आरोग्य सेवकांच्या माध्यमातून पांडुरंगच काळजी घेतोय'

दरम्यान, पालखी सोहळ्याचे प्रमुख पांडुरंग महाराज उंबरे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "आम्ही पांडुरंगाच्या भक्तीपोटी पंढरपूरच्या दिशेने पायी जात आहोत. मात्र आरोग्य सेवकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पांडुरंगच आमची काळजी घेत असल्याची प्रचीती येत आहे." याप्रसंगी विकास घडमोडे, आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आयोजित केलेल्या या शिबिरातून सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक मूल्यांची सुंदर सांगड पाहायला मिळाली.