मालेगावातील अत्याचार-हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाला कन्यारत्न; वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी घरी नव्या लेकीचे आगमन

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी या चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता. या दुर्दैवी घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना पीडित कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत. मयत चिमुकलीच्या आई-वडिलांना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

मालेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य सुकदेव देवरे यांनी या प्रसूतीसंदर्भात इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत.

'काही डिलिव्हरी खास असतात, काही त्याही पलीकडे'

डॉ. चैतन्य देवरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टर म्हणून ही प्रसूती त्यांच्यासाठी विशेष होती. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी कुटुंबातील लाडकी लेक, म्हणजेच अत्याचार-हत्या प्रकरणातील चिमुकली, त्यांना सोडून गेली होती. त्यानंतर बरोबर वर्षपूर्तीच्या एक दिवस आधी तिच्या आई-वडिलांच्या घरी पुन्हा एका मुलीचे आगमन झाले. गेल्या नऊ महिन्यांचा प्रवास कुटुंबाच्या दुःखावर काही प्रमाणात फुंकर घालणारा ठरल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. नवजात बाळाच्या आगमनानंतर आई, आजी आणि आत्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून संपूर्ण वैद्यकीय पथकही भावुक झाले. या कुटुंबाला पुन्हा आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा काही अंशी उपयोग झाला, याचे समाधान असल्याची भावना डॉ. देवरे यांनी व्यक्त केली. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय होते डोंगराळे अत्याचार-हत्या प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात नोव्हेंबर २०२५ मध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांशी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपी विजय खैरनार याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले होते.

या प्रकरणात अवघ्या तीन आठवड्यांत ४२५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य आणि जनभावना लक्षात घेऊन सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले होते. सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषी विजय खैरनार याला १६ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

वर्षभरापूर्वीच्या वेदनादायी घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच कुटुंबाच्या आयुष्यात नव्या लेकीचे आगमन झाले आहे. डॉ. देवरे यांच्या भावनिक पोस्टमुळे या घटनेची पुन्हा चर्चा होत आहे.