दुधनीत मोबाईल दुकानात तरुणाची हत्या; चौघांचा हल्ला, जुन्या वादातून खुनाचा संशय
दुधनी (सोलापूर) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मोबाईल दुकानात घुसून एका
तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी दुधनी येथे
घडली. या हल्ल्यात महेश धानप्पा गुड्डोडगी (वय ३०, रा. दुधनी, ता. अक्कलकोट,
जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मोबाईल दुकानात मित्रांसोबत गप्पा मारत असताना हल्ला
फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास महेश गुड्डोडगी हे दुधनी नगरपालिकेच्या गाळ्यातील शिवा मोबाईल शॉपी या दुकानात मित्रांसोबत बसून गप्पा मारत होते. त्यावेळी सचिन बसवराज कौलगी याच्यासह अन्य तीन तरुण दुकानात आले. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी महेश यांना लाथाबुक्क्यांनी आणि चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सचिन कौलगी याने चाकू काढून तो लोखंडी पाईपमध्ये ठेवत त्या पाईपने महेश यांच्यावर जोरदार प्रहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात महेश यांचा मृत्यू झाला.
भावाने दाखल केली पोलीस ठाण्यात फिर्याद
या प्रकरणी महेश यांचे भाऊ शिवकुमार धानप्पा गुड्डोडगी (वय ३२) यांनी
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल
करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.
आरोपींच्या शोधासाठी महाराष्ट्र-कर्नाटकात शोधमोहीम
घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली
आहेत. मुख्य संशयित सचिन बसवराज कौलगी आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य तीन
तरुणांचा शोध सुरू आहे. आरोपी महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने पसार झाल्याची
शक्यता लक्षात घेऊन दोन्ही राज्यांत शोधमोहीम राबवली जात आहे. आरोपींना लवकर
ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.