सोलापुरात छटपूजेचा भक्तिमय उत्साह; सिद्धेश्वर आणि संभाजी महाराज तलावावर महिलांची मोठी गर्दी
सोलापूर : छटपूजेनिमित्त शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव आणि
विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे महिलांची मोठी गर्दी झाली होती.
उत्तर भारतीय विकास मंचच्या वतीने छटपूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी
महिलांनी सहकुटुंब उपस्थित राहून मनोभावे पूजा केली. पारंपरिक वेशभूषा, छट
माईची गाणी आणि सूर्यदेवाच्या आराधनेमुळे दोन्ही तलाव परिसर भक्तिमय झाला होता.
दोन दिवसांच्या उपवासानंतर सूर्यदेवाची आराधना
छटपूजा हा उत्तर भारतीय बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण
मानला जातो. या पूजेसाठी महिला दोन दिवस कठोर उपवास करतात. त्यानंतर छट माई आणि
सूर्यदेवाची विधिवत पूजा केली जाते. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह मुलांच्या
दीर्घायुष्यासाठी महिला ही पूजा करतात.
२० प्रकारच्या फळांचा नैवेद्य
पूजेदरम्यान महिलांनी तलावाच्या काठावर पाण्यात उभे राहून सूर्यदेवाला
अर्घ्य अर्पण केले. यावेळी २० प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच ऊस
पाण्यात ठेवून सूर्यदेवाची पूजा करण्यात आली. गाईचे दूध, पान
आणि सुपारीही पाण्यात अर्पण करण्यात आली.
छट माईच्या गीतांनी परिसर भक्तिमय
पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी छट माईची पारंपरिक गाणी गायली.
त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांसोबत
कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तर भारतीय विकास मंचकडून विशेष व्यवस्था
छटपूजेचे आयोजन उत्तर भारतीय विकास मंचच्या वतीने करण्यात आले होते.
पूजा शांततेत आणि शिस्तीत पार पडावी यासाठी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
विशेष व्यवस्था केली होती. यावेळी मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.