‘मेडे, मेडे’चा अखेरचा संदेश अन् विमानाची भीषण दुर्घटना; वैमानिकाचे शेवटचे शब्द थरकाप उडवणारे
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ग्रीनएकर्स येथील निवासी
भागात लियरजेट ६० विमान कोसळून भीषण दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या
दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातापूर्वी
वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘मेडे, मेडे’ असा आपत्कालीन संदेश दिला होता. या
संभाषणाचे रेकॉर्डिंग समोर आल्याने दुर्घटनेची भीषणता स्पष्ट झाली आहे.
‘मेडे, मेडे... विमान
खाली कोसळत आहे’
हवाई वाहतूक नियंत्रणाच्या रेकॉर्डिंगनुसार, विमानाचे नियंत्रण सुटत असल्याचे वैमानिकाने सांगितले. विमान वेगाने खाली
उतरत असल्याची माहिती देत त्याने मदतीसाठी ‘मेडे, मेडे’ असा
संदेश दिला. रेकॉर्डिंगमधील संभाषणानुसार, विमानाचा खाली
उतरण्याचा वेग सतत वाढत होता. वैमानिकाने विमान ओव्हरस्पीडमध्ये असल्याचे
सांगितले. त्याचवेळी विमानातील प्रवासी मदतीसाठी ओरडत असल्याचेही रेकॉर्डिंगमध्ये
ऐकू आल्याचा दावा करण्यात आला आहे.
विमान जमिनीच्या दिशेने वेगाने येत असताना हवाई वाहतूक
नियंत्रकाने वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळून मोठा स्फोट झाला.
ऑस्टिनहून बहामासकडे निघाले होते विमान
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या माहितीनुसार, लियरजेट ६० विमानाने टेक्सासमधील
ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. हे विमान
बहामासमधील नॉर्थ एल्युथेराकडे जात होते. विमान सुमारे ३५ हजार फूट उंचीवरून
पूर्वेकडे प्रवास करत असताना वैमानिकांनी हवेतील हेलकावे, विमानावर
बर्फ साचणे आणि पाऊस किंवा बर्फवृष्टीची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी
विमानाला दोन हजार फूट खाली उतरवण्याची परवानगी मागितली होती.
प्रति मिनिट ३२ हजार फुटांपेक्षा अधिक वेगाने उतरण्याचा
दावा
उपलब्ध फ्लाइट डेटानुसार, विमानाचा खाली उतरण्याचा वेग सुरुवातीला प्रति मिनिट सुमारे १० हजार फूट होता. त्यानंतर तो २० हजार फूट आणि पुढे ३० हजार फूटांपेक्षाही अधिक झाला. काही नोंदींनुसार, विमानाचा उतरण्याचा वेग प्रति मिनिट ३२ हजार फुटांपेक्षा जास्त नोंदवण्यात आला. जमिनीकडे वेगाने झेपावत असताना विमानाने उजवीकडे वळण घेतल्याचेही फ्लाइट डेटामधून समोर आले आहे. विमानाचा शेवटचा सिग्नल सुमारे ८ हजार ७५० फूट उंचीवर नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.