ऑरेंज अलर्ट असतानाही हेलिकॉप्टरचे उड्डाण; जोशीमठ दुर्घटनेनंतर परवानगीवर प्रश्नचिन्ह

उत्तराखंडमधील जोशीमठ परिसरात झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर उड्डाणाच्या परवानगीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हवामान विभागाने चमोलीसह लगतच्या अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अशा परिस्थितीत खराब हवामानात हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी कशी आणि का देण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, उड्डाणाच्या वेळी हवामान पूर्णपणे स्वच्छ आणि अनुकूल होते, असा दावा उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने केला आहे. मात्र, डोंगराळ खोऱ्यात प्रवेश केल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला. उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांत हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि अपघात घडला. हवामान विभागाने दिला होता सतर्कतेचा इशारा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, शुक्रवारी चमोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही डेहराडून ते बद्रीनाथ आणि बद्रीनाथ ते डेहराडून या मार्गावरील हेलिकॉप्टर उड्डाणांना परवानगी देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेमुळे हेलिकॉप्टर कंपन्या हवामानविषयक नियम आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात की नाही, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. डीजीसीएच्या नियमांनुसार प्रतिकूल हवामानात उड्डाण करताना आवश्यक सुरक्षा निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे.

शुक्रवारी बद्रीनाथ परिसरातील हवामान सकाळपासून खराब होते. दुपारी काही काळासाठी ढग विरळ झाल्यानंतर एका हेलिकॉप्टरने उड्डाण केले; मात्र काही वेळातच ते कोसळले. याचवेळी उड्डाण केलेले दुसरे हेलिकॉप्टर डेहराडून येथे सुरक्षितपणे उतरले. काही मृतदेह जळालेल्या अवस्थेतया हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. ज्योतिर्मठचे उपविभागीय दंडाधिकारी चंद्र शेखर वशिष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मृतदेह जळालेल्या अवस्थेत, तर काही विद्रूप अवस्थेत आढळले आहेत.दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टर उड्डाणांसाठी हवामानाचा अंदाज, सुरक्षा नियम आणि परवानगी प्रक्रियेचे पालन झाले होते का, याची चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.