अर्णब चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पावसाचे
वातावरण निर्माण झाले आहे. अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार
नसला, तरी त्याच्या प्रभावामुळे हवामानात बदल जाणवत आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये
गेल्या तीन दिवसांपासून रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण झाला
आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. गुरुवारी
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती समोर
आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्याही राज्यातील
काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशीही पावसाची शक्यता
आहे. तळ कोकण, घाटमाथा, पूर्व
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
होऊ शकतो. या काळात वादळी वाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटाची शक्यताही वर्तवण्यात आली
आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज?
नाशिक, अहिल्यानगर, पुणे
आणि घाटमाथ्याच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच अमरावती, भंडारा, चंद्रपूर,
गडचिरोली, गोंदिया, नागपूर,
वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या विदर्भातील
जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या भागांत
ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या
कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
हवामानात बदल होण्यामागचे कारण काय?
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाली आहे. तसेच छत्तीसगडच्या आसपास खोल दाबाचे क्षेत्र (Deep Depression) तयार झाले आहे. अंदमानजवळ पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, बंगालच्या उपसागरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस होऊ शकतो.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस?
३१ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण तयार
होण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काही भागांत पाऊस सुरू
राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या
स्थितीचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी छत्तीसगडजवळील खोल दाबाचे क्षेत्र
आणि अंदमानजवळ तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती
निर्माण होऊ शकते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा
मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वादळी वारे आणि विजांच्या
कडकडाटासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष
द्यावे.