सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अमोल शिंदे मैदानात; नागरी पतसंस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महानगरपालिकेतील गटनेते अमोल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था या मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांतील नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून, अमोल शिंदे यांच्या उमेदवारीमुळे नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

सिद्धाराम म्हेत्रे यांचाही उमेदवारी अर्ज

अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील सदस्य या मतदारसंघातून अर्ज सादर केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.